Published On : Fri, Nov 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री ८ ते १० या वेळेत अन् कमी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन
Advertisement

नागपूर: नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता सायंकाळी ८ ते रात्री १०वाजताची वेळ निर्धारित केली असून, नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी करावी असे विनम्र आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

वायु प्रदूषणा संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशान्वये वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्याचे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरातील वायू प्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी याबाबत निरंतर कार्यवाही गरजेची असून त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने पाऊल टाकले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली असून या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलिस विभागाला देखील मा. उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. याशिवाय शहरामधील बांधकांम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.

इमारत बांधकाम स्थळावरील धुळ उडू नये व ते धुळीकण हवेत मिसळू नये यासाठी बांधकाम स्थळी लोखंडी पत्रे लावावेत तसेच सतत पाण्याची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास यांचेद्वारे शहरात कार्य सुरू असलेल्या सर्व ठिकाणी देखील नियमित पाण्याची फवारणी करण्याची आवश्यक दिशानिर्देशामध्ये नमूद करण्यात आली आहे.

बांधकाम स्थळांवर वा अन्य ठिकाणी जमा असलेल्या सी अँड डी कच-याचे धुलीकण हवेत मिसळू नयेत यासाठी हा कचरा पूर्णपणे झाकलेला असावा, याशिवाय बांधकाम मलबा ट्रकमधून डम्पिंग यार्डमध्ये घेउन जाताना तो देखील पूर्णपणे झाकलेला असावा तसेच रेडी मिक्स क्राँक्रिट तसेच बांधकाम साहित्य देखील झाकूनच आणले व नेले जावे, अशी देखील सूचना करण्यात आलेली आहे. शहरात कुठेही कचरा जाळण्यास बंदी आहे. कचरा जाळणा-यांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही कचरा जाळला जाउ नये, याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ ताफ्यातील सर्व बसेस आणि सर्व शासकीय वाहनांचे पीयूसी तपासण्याचे देखील मनपा परिवहन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीमध्ये फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणावर पडणारा विपरित परिणाम यासंबंधी शहरातील सर्व शाळांमधून जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी मनपा शिक्षण विभागाला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दीपावली सणामध्ये नागरिकांनी *रात्री ८ ते १० या वेळेतच* फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement