– हयगय झाल्यास कारवाई, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचा इशारा,महावितरणकडून ३ मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ तर अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
नागपूर : ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे व त्यासाठी मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. महावितरणकडून वीजमीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना सुरु आहेत. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारींमध्ये मोठी घट देखील झाली आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी कायमस्वरुपी करण्यात यावी व मीटर रिडींगच्या अचूकतेसाठी कोणतीही हयगय करू नये. वारंवार सूचना देऊनही अचूक रिडिंगसाठी सुधारणा न झाल्यास मीटर रिडींग एजन्सी व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी मंगळवारी (दि. ५) मीटर रीडिंग संदर्भात येथे घेतेलल्या आढावा बैठकीत दिला.
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सूचना देऊनही मीटर रीडींगमधील अचूकतेसाठी सुधारणा न केल्याने विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच ताबडतोब महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले तर संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या आढावा बैठकीत संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सीजच्या संचालकांना अचूक बिलींगमधील त्यांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी सांगितले की, मीटर रीडिंगमध्ये अचूकता नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच महावितरणच्या महसूलाचे देखील नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रीडिंग एजन्सीजवर आहे. एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई हा मुख्य उद्देश नाही. परंतु वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सीजच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. सोबतच जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमध्ये एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्त असल्याबाबत चुकीचा शेरा आदींची माहिती देण्यात आली व त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध उपाय सांगण्यात आले. १०० टक्के अचूक मीटर रीडिंगसाठी ठरवून देण्यात उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात यावी. त्यात कोणतीही हयगय करू नये. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. बिलिंगचे पर्यवेक्षण करावे. त्यातील अनियमितता टाळून वीजग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यात येईल याची सदोदित काळजी घ्यावी असे निर्देश संचालक. ताकसांडे यांनी यावेळी दिले.
या बैठकीमध्ये यावेळी कार्यकारी संचालक (देयके व महसूल). योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर), अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते उपस्थित होते. तसेच विदर्भातील सर्व कार्यकारी अभियंता व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.