नागपूर : विद्यमान प्रधान सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी आरोपी उमाशंकर ठाकूर वय 25 वर्ष रा. माळेगाव सावनेर) याची रोशन कमाले (रा. सावनेर ) याचा खून करण्याच्या आरोपातून निर्दोष सुटका केली आहे.
आरोपीने ९ ऑगस्ट 2021 रोजी दुपारी अकरा वाजता शक्तीनगर डब्ल्यूसीएल कॉलनी येथे रोशनच्या गळ्यात दुपट्टा अटकवून त्याचे डोके पाईप वर आपटून त्याचा खून केला. घटने पूर्वी सुमारे दोन वर्ष आधी मृतक आणि त्याचे मित्रांनी उमा शंकरचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रकरणात सेंट्रल जेल मधून ते बाहेर आल्यानंतर बदला घेण्यासाठी उमाशंकर ने हे कृत्य केले. घटनेच्या दिवशी उमाशंकर हा कॉलनीमध्ये दुधाचे वाटप करून येत होता त्यावेळी मृतक आणि त्याचे मित्र दीपक राजपूत ,पुटूस शर्मा ,नमन शर्मा यांच्यासह मैदानात बसला होता. ते सगळे मोबाईल वरती लूडो गेम खेळत होता. त्यावेळी आरोपी मागून आला आणि रोशनचे गळ्यात दुपट्टा अटकवून त्याचे डोके सिमेंटचे पाईप वर आपटून त्याला ठार मारले हे पाहून तिघेही मित्र पळून गेले.
यासंदर्भात त्यांनी मृतकाचा भाऊ अमोल कमाले याला माहिती दिली. अमोलच्या रिपोर्टवरून आरोपी उमाशंकर विरुद्ध गुन्हा कलम 302 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय शिवाजी नागवे आणि एपीआय सागर कारंडे यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणांमध्ये मृतकाच्या मित्रांसह एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर विश्वास ठेवून आरोपीला कठोर शासन करण्यात यावे अशी विनंती सरकारतर्फे करण्यात आली. बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट चंद्रशेखर जलतारे यांनी न्यायालयाला सांगितले की या प्रकरणी आरोपी हा निर्दोष आहे. त्याला संशयावरून फसवण्यात आले.
आरोपी उमाशंकर स्वतः एका पायाने दिव्यांग आहे. मृतक हा त्याचे चार मित्रांसह होता,अशावेळेस एक आरोपी एवढे मोठे कृत्य करू शकेल यावर विश्वास बसू शकत नाही. त्याचप्रमाणे मित्रांची वागणूक ही संशयास्पद वाटत आहे. कारण त्यांनी पोलिसांना उशिरा बयाने दिली. कदाचित लुडो खेळताना त्याच्या मित्रांनीच रोशनचा खून केला असावा ही शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान न्यायाधीशानी दोन्ही बाजूंचा विचार करून आरोपीला संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले सरकार तर्फे एपीपी लीना गजभिये तर आरोपी उमाशंकर तर्फे अॅड चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले.