नागपूर : जरीपटका पोलीस स्टेशनअंतर्गत मेकोसाबाग परसिरात धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या दोन बाटल्यांसाठी मालकाने स्वतःच्याच अवैध दारूच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून ठार मारल्याची माहिती समोर येत आहे. कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर रेल्वे लाईनजवळ फेकून दिल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला.
सिकंदर उर्फ शेकू शफी खान (वय 35, रा. मेकोसाबाग) असे आरोपीचे नाव आहे. प्रमोद पॉल फ्रान्सिस (५२) असे मृताचे नाव असून तो मेकोसाबाग परसिरातच वास्तव्यास आहे.
शेकूवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला होता. याच महिन्यात पोलिसांनी शेकू आणि त्याच्या टोळीला शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात अटक करून 4 पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली. मेकोसाबाग परिसरात अनेक दिवसांपासून शेकू हा अवैध दारू धंदा चालवत आहे. प्रमोद त्यांच्या अड्ड्यावर काम करायचा.
माहितीनुसार, मंगळवारी प्रमोद याने शेकूच्या सामानातून 2 दारूच्या बाटल्या चोरल्या. शेकूला हा प्रकार कळला. त्याने प्रमोदला त्याच्या अड्ड्यावरच बेदम मारहाण केली. त्याच्यावर काठीने हल्ला केला. गंभीर जखमी प्रमोद बेशुद्ध झाला. शेकूने ही बातमी कोणालाच कळू दिली नाही आणि रात्री उशिरा साथीदारांच्या मदतीने गोवा कॉलनीजवळील रेल्वे लाईनजवळ फेकून दिले.
बुधवारी सकाळी प्रमोद मृतावस्थेत आढळला. प्रमोदचा मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाल्याचे कुटुंबीयांना वाटत होते. कुटुंबीयांनी त्याला घरी नेले आणि अंतिम संस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर प्रमोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. शरीराच्या अनेक भागांवर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी आपल्या प्राथमिक अहवालात दिली आहे.
या संदर्भात जरीपटका एसएचओ अरुण क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संशयाच्या आधारे प्रमोदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी शेकूचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.