नागपूर: इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एक खळबळजनक घटना घडली. बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देऊन थेट पोलीस ठाण्यातून पळ काढण्याचे धाडस केले. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.
या आरोपीचे नाव विवेक बडोले (रामबाग) असून त्याच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि छेडछाडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. माहितीनुसार, त्याने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो तुरुंगाबाहेर आला.
सध्या नागपुरात घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पुन्हा त्याचे नाव समोर आल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली. सोमवारी सकाळी विवेकने पोलिसांना सांगितले की, त्याला उलटी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला लॉकअपबाहेर नेऊन शौचालयाकडे नेत असताना, त्याने अचानक पोलिसाला जोराचा धक्का दिला आणि तिथून पळून गेला.
ही घटना घडताच पोलिस दलात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि परिसरात नाकाबंदी करण्यात आली. सुमारे दीड तासांच्या शोधानंतर रामबाग परिसरातून त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आता त्याच्यावर लॉकअपमधून पळ काढल्याचा स्वतंत्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.