जळगाव : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीशी जळगावमध्ये छेडछाड झाल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि इतरांना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की, एका पक्षाचे काही अधिकारी आहेत ज्यांनी हे केले आहे. हे एक घृणास्पद कृत्य आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. अशा प्रकारचा छळ चुकीचा आहे आणि असे करणाऱ्या आरोपींना माफ केले जाऊ शकत नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान रक्षा खडसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त परिसरात संत मुक्ती यात्रा आयोजित केली जाते. दोन दिवसांपूर्वी माझी मुलगी यात्रेत गेली होती. तेव्हा काही तरुणांनी तिला त्रास दिला. मी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. रक्षा खडसे यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर सांगितले की, घटनेदरम्यान आरोपीने मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडली आणि त्यांना धमकी दिली. एका सूत्रानुसार त्यापैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि ते शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधीत आहेत.