नागपूरः १८७ किलो गांजाची ट्रकमधून तस्करी करण्याच्या प्रकरणातील पाचही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. राष्ट्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारा (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली होती, हे विशेष. रामू विष्णू अग्रवाल, सौब्राण हकीम सिंग, विनोदकुमार रतनलाल सोनी, मोहम्मद नियाजुद्दीन मोहम्मद मोईनुद्दीन आणि अमितकुमार आनंदगोपाल सिंग अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत.
२५ फेब्रुवारी २०१९ ला डीआरआयच्या नागपूर कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की वर्धा मार्गाने एक ट्रक येत असून त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एक चमू तयार करून एयरपोर्ट चौकात ट्रक थांबवले. त्यावेळ ट्रक चालक रामू अग्रवाल व त्याच्या शेजारी सौब्राण सिंग बसला होता. ट्रकच्या मागच्या भागात इतर आरोपी होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली पण त्यांना काहीही सापडले नाही. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ट्रक व सर्व आरोपी जीएसटी कार्यालयात घेऊन गेले.
त्या ठिंवाणी आरोपींची कसून चौकशी असता ट्रकच्या खालच्या भागात एक विशिष्ट कप्पा तयार केलेला असून त्यात गांजा लपवला असल्याची माहीती, रामूने दिली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सर्व दस्तावेज तयार करून गुन्हा दाखल केला. ट्रकचा खालचा भाग उघडला व त्यातून १७८ किलो गांजा जप्त केला. आरोपींना अटक करण्यात आली. दोन दिवसांनी सर्व गांजा व ट्रक न्ययदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करून जप्ती पंचनामा तयार करण्यात आला. तपास करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ५ आर. एस. पावसकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डीआरआयतर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षपुरावा आणि सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.
आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी, ॲड. मंगेश राऊत, ॲड. चेतन ठाकूर आणि ॲड. नालस्कर यांनी बाजू मांडली. चौकट जप्तीच संशयास्पद डीआरआयने २५ फेब्रुवारी २०१९ ला ट्रकमधून गांजा जप्त केला. त्यानंतर तो गांजा सीजीएसटी कार्यालयात जमा केला व २८ फेब्रुवारी २०१९ ला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमक्ष गांजा व ट्रक सादर करण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष गांजा सादर करण्यापूर्वी डीआरआयने तीन दिवस गांजा व्यवस्थित कुणाच्या ताब्यात ठेवला होता, याचा पुरावा संशयास्पद असल्याचा युक्तिवाद बचावपक्षाने केला. तसेच आरोपींची अंगझडती घेताना नियंमांचे पालन करण्यात आले नाही व त्यामुळे डीआरआयच्या संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असाही युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.