नागपूर: नागपुरातील विशेष सत्र न्यायाधीश सलमान आजमी यांनी आरोपी मयूर फुले(टोळी प्रमुख),अमोल वाघमारे, रितेश तायडे ,हिमांशू नांदगावे, अभय कांबळे सर्व राहणार रामबाग इमामवाडा नागपूर यांची अनिल बंजारे याचा खून करण्याच्या आरोपातून तसेच मोक्का कायद्यामधून निर्दोष सुटका केली आहे.
माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी रोहित फुसाटे आणि अभय कांबळे यांच्यात वाद झाला . त्यावेळी रोहितचा जिजा अनिल बंजारे याने अभय कांबळेला शिवीगाळ केली . या गोष्टीचा बदला घेण्यासाठी म्हणून सर्व आरोपी आणि टोळी प्रमुख मयूर फुले हे रात्री 9 वाजता रोहितच्या घरी गेले आणि तलवारी दाखवून घराची नासधूस केली, तसेच अक्षय फुसाटे याला मारहाण करून निघून गेले.
सदर घटनेचा रिपोर्ट देण्यासाठी मृतकाची पत्नी क्षमा बंजारे आणि रोहित फुसाटे हे जात असता त्यांना माहिती मिळाली की, वरील सर्व आरोपींनी मामा सरदार यांचे घराजवळ अनिल बंजारे याचा तलवार, चाकू खंजीर आणि दगडाने मारहाण करून खून केला आहे . सदर घटनेचा तपास इमामबाडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी धनराज शिंगाडे अतुल मोहनकर आणि जयदीप पवार यांनी केला. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य आणि टोळी असल्याने सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान आरोपींकडून दोन तलवारी ,तसेच चाकू आणि रक्तरंजित कपडे जप्त करण्यात आले .तत्कालीन आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांच्यासमोर आरोपी हिमांशू नांदगावे याने गुन्ह्याची कबुली दिली.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह या प्रकरणी एकूण 23 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची बयाने, शस्त्र जप्ती, कपडे जप्ती आणि कबुली जबाब विचारात घेता गुन्हा सिद्ध होत असून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी विनंती युक्तिवाद सरकारतर्फे अभय जिकार यांनी केला आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करताना ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी न्यायालयाला सांगितले की कबुली जबाब हा दबावाखालती घेण्यात आलेला आहे ,तसेच कोणतीही टोळी होती अथवा त्या टोळीने गुन्हे करून पैसे जमवले असा पुरावा नसल्याने मोक्का कायदा या प्रकरणात लागत नाही त्यामुळे मोक्का कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या कबुलीजबाबाला अर्थ उरत नाही .
ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी असेही सांगितले की मृतक अनिल हा स्वतः गुन्हेगार होता आणि त्यावर अनेक केसेस सुरू होत्या. त्याचे अनेक दुश्मन होते त्यामुळे त्याला कोणीतरी मारले असावे. शस्त्र आणि कपडे जप्ती संबंधी युक्तिवाद करताना ॲड.जलतारे यांनी सांगितले की, या वस्तू योग्य रीतीने सीलबंद करण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे या जप्ती पंचनाम्यांवर विश्वास ठेवता येणार नाही .
सर्व परिस्थिती आणि पुराव्याचा सखोल विचार करून न्यायाधीशांनी सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले सरकार तर्फे एपीपी अभय जिकार आणि आरोपीतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले.