नागपूर :जनआक्रोशच्या रस्ते सुरक्षासंदर्भातील मोहिमेला मूर्त स्वरूप द्यायचे असेल, जनआक्रोशचा उद्देश सफल व्हायचा असेल तर त्याकरीता स्वयंघोषित ‘ॲम्बेसेडर’ म्हणून मी काम करणार आहे. चळवळीमध्ये सहभागी होऊन सरकारदरबारी आवाज पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील, अशी घोषणा विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी केली.
जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो या रस्ते सुरक्षेसंदर्भात काम करणा-या संस्थेच्यावतीने पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचे ‘रस्ते सुरक्षा’ विषयावर बुधवारी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. याप्रसंगी मंचावर जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, सचिव रविंद्र कासखेडीकर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्सचे अध्यक्ष मिलिंद पाठक व सचिव डॉ. जुगलकिशोर अग्रवाल यांची उपस्थिती होती.
लोकांना कितीही सांगितले तरी ते हेल्मेट वापरत नाही, सिटबेल्ट लावत नाही. कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय त्यांना शहाणपण येणार नाही. त्यासाठी दबंगगिरी करावी लागेल, कायदा व सुरक्षा यंत्रणेची मदत घ्यावी लागेल, स्वयंशिस्त अंगिकारावी लागेल आणि आत्मचिंतन करावे लागले, असे ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले.
ॲड. निकम यांनी जनआक्रोशच्या कार्याचे कौतूक केले. दुसऱ्याचे दु:ख समजून घेण्यासाठी मन मोठे असावे लागते तर त्यांचे सुख समजून घेण्यासाठी मनाची श्रीमंत लागते. निवृत्तीनंतर वयाच्या या टप्प्यात दुस-याचे अहित होऊ नये, नुकसान होऊन ही भावना मनात येणे मोठे परमेश्वरी कार्य असून जनआक्रोशच्या सदस्यांचे त्यासाठी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. तसेच या अभियानाला शासकीय एजन्सीकडून सहकार्य मिळाले तर ही चळवळ मोठी होईल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना अनिल लद्धड यांनी रस्ते अपघाताच्या समस्येचे स्वरूप विक्राळ झाले असून त्यावर खूप आत्मचिंतन, मंथन झाले. कायद्याची भीती दाखवली गेली. पण उद्देश साध्य झाला नाही. त्यासाठी प्रभावशाली कायदा व त्याची अंमलबजावणी आवश्यक असली तरी त्याला आत्मचिंतन व आत्मपरिवर्तनाची पण जोड द्यावी लागेल, असे ते म्हणाले. वाढती लोकसंख्या आणि समस्येचे गांभीर्य बघता ॲड. निकम यासारख्या अनेकांनी चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी, ॲड. निकम यांचा जनआक्रोशतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच, रस्ते सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अशोक करंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. जनआक्रोशसोबत रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करार करणा-या विविध महाविद्यालयांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
जनआक्रोशचे दिवंगत सदस्य डॉ. सुनीती देव, दिलीप मुकेवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजीव संघई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कोठारी यांनी केले आहे. मिलिंद पाठक यांनी आभार मानले.