नागपूर : शहरात 15 ऑगस्टच्या निमित्ताने सायलेन्सरचा आवाज मोठा करून टवाळखोरी करणाऱ्या आणि फटाक्याचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्याविरोधात वाहतूक पोलीस विभागाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी सदर ट्राफिक झोन मध्ये बुलेट चालकांवर कारवाई करत एकूण 48 बुलेट जप्त केल्या. तसेच इतर कारवाई अंतर्गत 14 गाड्या अशा एकूण 62 गाड्या जप्त केल्याची माहिती आहे .
वाहतूक नियमांची पायमल्ली करत काही बुलेट चालकांची अरेरावी वाढली आहे. सायलेन्सरमध्ये बदल करून वाहनचालक वाहनाचा आवाज वाढवितात. कर्कश आवाजामुळे इतर चालकांना वाहन चालविणे कठीण जाते. काही वाहन चालक फटाके फोडणारे आवाज काढतात. अचानक होणाऱ्या या आवाजामुळे वाहनचालक दचकून अपघात होण्याची शक्यता असते.
विशेष म्हणजे, असे बुलेट चालक अतिवेगाने वाहन चालवित असल्याने वाहतूक पोलिसांना त्यांना पकडणेही कठीण जात होते. त्यामुळे वाहतूक विभागासाठी बुलेट चालक डोकेदुखी ठरत होते.पोलीस उपायुक्त (वाहतूक) चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात वाहतूक सादर झोनचे प्रभारी अधिकारी प्रशांत अन्नछत्रे यांनी ही कारवाई केली आहे.