नागपूर– नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मोहम्मद अफाक उर्फ सलमान अंसारी वल्द मोहम्मद इसराईल (वय २६, रा. कमाल बाबा दर्गा, मोमीनपुरा) याच्यावर विविध गुन्हेगार व इतर विघातक प्रवृत्तींवरील अधिनियम १९८१ अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी जारी केला.
मोहम्मद अफाक याच्याविरुद्ध पोलीस ठाणे तहसिल हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, स्त्रीचे अपहरण, लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, अपमान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर २०१९, २०२१ व २०२४ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवायांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नसून त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफाक याच्या वाढत्या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसिल पोलीस ठाणे यांनी गुन्हे शाखेस त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस आयुक्त,रवींद्र सिंगल यांनी सदर प्रस्तावास मान्यता देत मोहम्मद अफाक यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, हर्मूल येथे स्थानबद्धतेच्या आदेशानुसार ठेवण्याचा आदेश दिला आहे. सद्यस्थितीत त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.