नागपूर:रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची नोटीस आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशाला त्यांनी आव्हान दिले आहे. केवळ राजकीय आकसापोटी विविध बाजूने कारवाई केली जात असल्याचा आरोप बर्वें यांनी याचिकेच्या माध्यमातून केला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्राचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून नियमानुसार कारवाई करा व त्याचा अहवाल द्या असा आदेश सामाजिक न्याय विभागाने पडताळणी समितीला दिला आहे. त्यामुळे बर्वे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी विविध बाजूने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रश्मी बर्वे यांच्या विरोधातील दोन वादग्रस्त आदेश माहिती राज्य माहिती आयोगाने बॅकफूटवर जाऊन मागे घेतले होते.
दरम्यान रश्मी बर्वे या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. यादरम्यान आम्ही शक्तिप्रदर्शनही करणार आहोत. बर्वे यांच्या विरोधात नुकताच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले राजू पारवे मैदानात आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रावर कितीही विवाद केला तरी माझा न्यायालयावर विश्वास असल्याचे रश्मी बर्वे यांनी सांगितले