नागपूर: शहरातील गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ च्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे कारवाई करत वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून, त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
फिर्यादी भोजराज केशवराज लूटे (वय ४४, रा. हिरवी ले-आउट, एनआयटी मैदानाजवळ, नागपूर) यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी नमूद केले की, दिनांक १९ मे २०२३ रोजी दुपारी सुमारास त्यांनी आपली हिरो होंडा डिलक्स (क्रमांक एमएच ३१ डीबी ४२५८) ही मोटरसायकल अयोध्या नगर पोस्ट ऑफिसजवळ पार्क केली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेली.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, कामठी रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती चोरीच्या गाड्या विक्रीसाठी आणत आहे. लगेचच पथकाने सापळा रचत कारवाई केली आणि सलमान खान मुनीर खान (वय ३४, रा. चित्तरंजन नगर, कामठी, नागपूर) या आरोपीला दोन वाहनांसह ताब्यात घेतले.
आरोपीने चौकशीदरम्यान कबुली दिली की, त्याने नागपूर व छत्तीसगड येथून हिरो होंडा डिलक्स आणि होडा शाईन (क्रमांक सीजी ०८ एएच ४२५२) या मोटरसायकली चोरी केल्या होत्या. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे ६०,००० रुपये किमतीची दोन वाहने जप्त केली असून, पुढील चौकशीसाठी त्याला सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल, सह आयुक्त निसार तांबोळी, अपर आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) ,अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन भोंडे आणि त्यांच्या चमूने केली. या पथकात पोहवा. रवि अहीर, नितीन वासनिक, योगेश वासनिक, पोअं. स्वप्नील खोडके आणि मंगेश बोरकर यांचा समावेश होता.
दरम्यान शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.