नागपूर : रेल्वेगाडीतील प्रवाशांचे चतुराईने मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला ट्रेन एस्कॉर्ट पार्टीने शिवनाथ एक्स्प्रेसमधून अटक केली. यादरम्यान रेल्वेगाडीत कर्तव्यावर असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची आरपीएफ एस्कॉर्ट पार्टी कर्तव्यावर होती.
१८२३९ शिवनाथ एक्स्प्रेसच्या कोच नंबर एस-८ मध्ये ५ जानेवारीला रायपूर येथील जफर अली सय्यद अब्बास अली नागपूरला येण्यासाठी सहपरिवार प्रवास करीत होते. यादरम्यान आरोपीने त्यांचा फोन लंपास केला.
आपला फोन चोरीला गेलेल्याची बाब जफर अली यांच्या लक्षात आली. यावेळी रेल्वेगाडीत कर्तव्यावर असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या आरपीएफ एस्कॉर्ट पार्टीशी त्यांनी संपर्क साधला. जफर यांनी माहिती देताच एस्कॉर्ट पार्टीने रेल्वे डब्यात चाैकशी सुरू केली.
डब्यातच काही दूरवर आरोपी लपून बसल्याने टीमला संशय आला. त्याच्या ताब्यातून जफर अली यांच्या मालकीचा फोन जप्त करण्यात आला. आरोपीची प्राथमिक चाैकशी केली असता त्याने यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे कबूल केले.
ही घटना गोंदिया जीआरपीच्या हद्दीत घडल्याने एस्कॉर्ट पार्टीने आरोपीला गोंदिया जीआरपीच्या ताब्यात दिले. शनिवारी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.