नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहावर ठोठाविला दंड : सभागृह संचालकासह लग्न परिवाराकडून दंड वसूल
नागपूर: नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी तुकाराम सभागृहाचे संचालक व ज्यांच्याकडचे लग्न समारंभ होते त्यांच्याकडून प्रत्येकी रु. ५००० दंड वसूल केले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोली झोन शोध पथक प्रमुख नरहरी बिरकड व अरविंद लाडेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
…तर मंगलकार्यालये होणार सील
१६ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी मोठ्या संख्येत लग्न समारंभ आहेत. लग्न समारंभामध्ये सर्सासपणे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अशी ठिकाणे कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे यादृष्टीने महत्वाचा निर्णय मनपा आयुक्तांद्वारे घेण्यात आला आहे. शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या मंगलकार्यालय, लॉन आदी ठिकाणी आढळल्यास संबंधित मंगलकार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. मनपाच्या शोध पथकाने प्रत्येक मंगल कार्यालय, लॉन वर नजर ठेवली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.