नागपूर: धरमपेठ परिसरात काही युवकांनी उशिरा रात्री रस्त्यावर धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकांचा शोध घेतला.
ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान घडली. युवकांनी गाडीतून येत जोरजोरात हॉर्न वाजवत नाचण्यास सुरुवात केली. त्यांनी अंगावरील शर्ट काढून रस्त्यावर आरडाओरड केली, त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले.
या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी लक्ष घालून युवकांना ओळखले व त्यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बे पोलीस कायदा (BP Act) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
धरमपेठ परिसरात लाउंज आणि पब मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर पोलिसांनीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले आहे.