नागपूर : सोनेगाव परिसरात ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर चाकूने हल्ला करून ३२ लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांविरुद्ध नागपूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) लावण्याची तयारी केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 लाख रुपये रोख, 8 लाख रुपयांचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये हृषिकेश पेंडले यांचा समावेश असून त्याने सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ हौसिंग सोसायटीत एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध सुरेश पोटदुखे यांच्यावर चाकूहल्ला केल्याची माहिती आहे.
शुभम उर्फ अप्या प्रकाश मानके (२७, रा. रामबाग) , नयझर उर्फ सॅनिटायझर रोनाल्ड लॉरेन्स (१९, रा. इंदिरा नगर, इमामवाडा), विनायक दौलतराव मुंडाफळे, (५४, रा. सर्वश्री नगर, हुडकेश्वर, विनोद विठ्ठलराव सोनटक्के (४९, रा. प्लॉट क्र. ११, दसरा रोड, महाल ), हृषीकेश मनोज पेंडले (२०, रा. मेकोसाबाग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस आयुक्त (सीपी) अमितेश कुमार यांनी सांगितले की, आरोपींचा अगोदरपासूनच गुन्ह्यांचा इतिहास असल्याने त्यांच्यावर मोक्का लावला जाईल.
आरोपी प्रकाश मानके याच्यावर जवळपास २० खटले आहेत. आम्ही या प्रकरणात मोक्का लागू करण्याचा विचार करत आहोत. आम्ही या प्रकरणात दरोड्याचे आरोप देखील लावले आहेत, असेही कुमार म्हणाले. तसेच त्यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, शुभांगी देशमुख आणि इतरांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकांचे कौतुक केले.
गुन्हे शाखेच्या पथकांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक आणि मॅन्युअल बुद्धिमत्तेचा वापर केला. डीसीपी क्राईम मुम्माका सुदर्शन आणि झोनल डीसीपी अनुराग जैन या प्रकरणाचे निरीक्षण करत आहेत, अशी माहिती कुमार यांनी दिली.