जागतिक बँकेतर्फे ‘रुफ टॉप सोलर’ कार्यक्रम
नागपूर: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी व्यवसायात अधिक कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने छतावरील सौर प्रकल्प उभारण्यासाठी कमी किमतीच्या कर्ज योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
जागतिक बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे नवी दिल्लीत रूफ टॉप सोलरवर एक संवाद आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. जागतिक बँकेचे संचालक आणि स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. गडकरी म्हणाले- छतावर बसविण्यात येणारे सौर यंत्रे एमएसएमईसाठी फायदेशीर आहेत. यामुळे विजेच्या बिलांमध्ये बचत होणार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचे योगदान 30 टक्के आहे. एमएसएमईना छतावर सौर संयत्रे उभारण्यास मदत करण्यासाठी मंत्रालय जागतिक बँकेच्या पतहमी कार्यक्रमावर काम करीत आहे.
मोठ्या संयंत्राद्वारे सौर ऊर्जा दर प्रतियुनिट 1.9 रुपयावर येऊ शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जागतिक बँक आणि स्टेट बँक यांचा एमएसएमईला वित्तपुरवठा करण्याचा हेतू आहे. सौर ऊर्जेचा प्रतियुनिट दर लक्षात घेता उद्योगांनी आपला विजेचा खर्च कमी करण्यासाठी या योजनेत सहभागी झाले पाहिजे. जागतिक बँकेने 2016 मध्ये रुफ टॉफ फंडिंग कार्यक्रम सुरू केला. त्याची अमलबजावणी स्टेटबँक करीत आहे. एमएसएमईंना जवळच्या स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन या योजनेचा लाभ घेता येईल.
भारतात सौर ऊर्जेचा वेगाने प्रचार आणि प्रसार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी-आयएसएच्या नव्या अहवालात असे म्हटले आहे की, सौर ऊर्जेसाठी भारत आता जगात अग्रगण्य बाजारपेठांपैकी एक आहे.
‘इज ऑफ डूईंग सौर 2020’ या अहवालात सन 2020 मध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्या देशांची ओळख पटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळेच देशाने सौर ऊर्जेसह प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यांच्यात नेतृत्वात आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीकडे आम्ही जात आहोत, असेही ना. गडकरी म्हणाले.