नवी दिल्ली: आधार कार्ड वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आधार कार्डमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आज सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी निकाल दिला. आधार कार्ड वैधच असल्याचं न्यायालयानं म्हटलं. आधार कार्डमुळे देशातील सामान्य नागरिकाला वेगळी ओळख मिळाल्याचं न्यायालयानं निकालाच्या वाचनात म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच 27 याचिका दाखल झाल्या होत्या. आधार कार्डच्या सक्तीमुळे घटनेनं नागरिकांना दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. पॅन लिंक करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र सीम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार गरजेचं नाही, खासगी कंपन्यांना आधारची सक्ती करता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड गरजेचं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं.
आधार कार्ड वैध की अवैध याबद्दल सुनावणी करताना न्यायालयानं आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांमध्ये फरक असल्याचं म्हटलं. आधार कार्डसाठी व्यक्तीच्या हाताचे ठसे घेतले जातात. त्याशिवाय डोळ्यांचं स्कॅनिंगदेखील केलं जातं. त्यामुळे आधार कार्ड सर्वार्थानं वेगळं ठरतं, असं न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. आधी शिक्षणामुळे आपण अंगठ्यापासून स्वाक्षरीपर्यंत आलो. मात्र आता तंत्रज्ञानामुळे आपण पुन्हा स्वाक्षरीकडून अंगठ्याकडे जात आहोत, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयानं निकालाचं वाचन करताना केलं.