नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून स्थानिकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याचदरम्यान शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लावण्यात आला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही फोटो लावण्यात आले आहे.