नागपूर: योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. वस्तू सेवा करासंदर्भात आतापर्यंत जी.एस.टी. परिषदेच्या 27 बैठका झाल्या असून या प्रत्येक बैठकीत वस्तू सेवा कराची आकारणी, अधिभार, कायदेशीर कार्यवाही या विषयी चर्चा करून त्वरीत निर्णय घेतल्या गेले. अशाच प्रकारे प्रशासकांनी आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेणे हीच मूलभूत जबाबदारी मानून आपले कार्य करावे, असे प्रतिपादन वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी आज नागपूर येथे केले. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय राजस्व सेवेतील 70 व्या तुकडीच्या दिक्षांत समारंभा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य बी. डी. विष्णोई उपस्थित होते तर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक डॉ. पुष्पेंद्रसिंग पुनिया, अतिरिक्त महासंचालिका-3 लीना श्रीवास्तव, अतिरिक्त महासंचालिका -2 नौशिन जहॉ अंसारी व अतिरिक्त महासंचालक-1 राजीव रानडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नोकरीमध्ये पद किंवा हुद्दा यापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग व दृष्टीकोन हा महत्वाचा असून नोकरीमध्ये गुणवत्ता वर्धनाच्या साहाय्याने उत्कृष्ठता आणणे, हे महत्वाचे आहे. आयकर अधिका-यांना इतर शासकीय विभागामध्ये प्रतिनियुक्तीच्या संधी मिळतात. त्याचा त्यांनी लाभ घेऊन एक व्यापक कार्यक्षेत्र निवडावे, असे आवाहन डॉ. अधिया यांनी यावेळी केले. अधिका-यांनी सदैव शिकण्यासाठी तत्पर रहावे असे सांगून उच्च शैक्षणिक संस्थामध्ये लोकसेवा व प्रशासनासंदर्भातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अधिका-यांना पगारी शैक्षणिक रजा मिळते. यातून अशा अधिका-यांना त्यांच्या इतर सहकारी अधिका-यांपेक्षा वरचढ कारकीर्द करता येते, अशी माहिती त्यांनी दिली. अधिका-यांनी आपल्या कार्यशैलीत कर्मयोगाच्या पंचसूत्रीचा अवलंब करावा. कोणतेही कार्य करतांना आचारसंहितेला तडा जाणार नाही, नोकरी करत असतांना अत्यंत प्रामाणिकपणा, काळजी व ध्यान देणे, आपल्या कार्याचा कोणत्याही व्यक्तीगत हेतूसाठी वापर न करणे, कार्यातून मिळणा-या चांगल्या-वाईट परिणामांचा स्वीकार करणे व अहंकार न बाळगणे या पाच सूत्राचा अवलंब करुन कर प्रशासक त्यांच्या कारकीर्दीमध्ये नवी उंची गाठू शकतात, अशी भावना डॉ. अधिया यांनी व्यक्त केली. आयकर अधिका-यांनी प्रत्यक्ष फिल्डवरचा अनुभव अर्थमंत्रालयातील वरिष्ठांसोबत मांडावा, असे आवाहनही डॉ. अधिया यांनी केले.
भारतीय अर्थव्यवस्थेत व राष्ट्रनिर्माणामध्ये आयकर विभागाची महत्वाची भूमिका असते. आयकर अधिकारी राजस्व संकलनाच्या माध्यमातून विकास कार्यासाठी देशाला लागणारा निधी शासनाच्या राजकोषात जमा करतात. मूल्यांकन अधिकारी म्हणून आयकर अधिकारी यांनी पारदर्शकपणे व कायदयाच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय प्रतयक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य बी.डी. विष्णोई यांनी प्रशिणार्थी अधिका-यांना केले.
16 महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिका-यांना 7 दिवसाच्या युरोप अभ्यास दौ-यावर पाठवले गेले. यातून त्यांना युरोपीय देशातील करप्रणालीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. छिंदवाडा जिल्हयातील पातळकोटमधील 28 गावांमध्येही अधिका-यांना सामाजिक उपक्रमांसाठी पाठवले गेले. सेवाग्राम पवनार आश्रम भेट, भारत दर्शन, हिमालय पर्वतरागांमध्ये साहसी दौरे इत्यादी उपक्रमांचाही प्रशिक्षणात समावेश केला गेला, अशी माहिती 70 व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा सांगतांना अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव यांनी दिली.
या तुकडीत एकूण 153 अधिक-यांपैकी 42 अधिकारी महिला असून 2 अधिकारी हे रोयाल भूटान सेवेतील अधिकारी आहेत. बहुतांश अधिकारी हे उत्तरप्रदेश राज्यातील असून त्या खालोखाल राजस्थान व तामिळनाडूतील अधिकारी आहेत. तुकडीतील अधिका-यांचे सरासरी वय हे 28 इतके असून अभियांत्रिकी शिक्षण पार्श्वभूमी असलेले अधिकारी सर्वात जास्त आहेत. दोन तृतीयांश अधिका-यांना यापूर्वी शासकीय नोकरी, सार्वजनिक उपक्रम व बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीचा अनूभव आहे, अशी माहिती 70 व्या तुकडीचा प्रशिक्षण अहवाल माडतांना प्रशिक्षण संचालक संजय धारिवाल यांनी दिली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम – अनुभूती, ‘इंडिया डे’ तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव-‘इंटॅक्स’ या सारख्या कार्यक्रमातून अधिका-यांचे व्यक्तीमत्व व्यापक झाले आहे. या तुकडीतील 40 अधिका-यांनी अवयवदाते म्हणून अवयदान-शिबीरात नोंदही केले असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रशिणार्थी अधिका-यांना करप्रशासकाची शपथ अकादमीचे अतिरिक्त महासंचालक -1 राजीव रानडे यांनी दिली. अकादमीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरीसाठी दिले जाणारे अर्थमंत्री सुवर्ण पदक हे प्रशिणार्थी अधिकारी कविता पाटील यांना डॉ. अधिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याशिवाय विविध श्रेणीत 10 अधिका-यांनाही सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलीत.सर्व 153 अधिका-यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्रही देण्यात आले.
70 व्या तुकडीतील प्रशिणार्थी अधिकारी दीपा फरहद, अवधकिशेर पवार, जया लखानी यांनी यावेळी आपले प्रशिक्षणातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. प्रधान महासंचालक डॉ. पुनिया यांनी आपल्या प्रस्ताविकातून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहयोगी प्रशिक्षण संचालक-2 ऋषी कुमार बिसेन यांनी केले.या कार्यक्रमाला 70 व्या तुकडीतील भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी, त्यांचे पालक, अकादमीतील शिक्षक, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या दिक्षांत समारंभानंतर वित्त सचिवांच्या हस्ते अकादमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व महात्मा गांधीच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.