७५ कोटी सूर्यनमस्काराच्या यज्ञात मनपाचे १६६७५ सूर्यनमस्कार योगदान
नागपूर: सूर्यनमस्कार हे अत्यंत प्रभावी योग प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे नखापासून ते केसापर्यंत सर्व अवयवांचा व्यायाम होतो. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने नियमीत योग करणे आवश्यक आहे. नियमित सूर्यनमस्कारामुळे व्याधी दूर होतात, तणावमुक्त राहता येते. त्यामुळे जीवनात सूर्यनमस्कार नियमित अंगीकृत करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ७५ कोटी सूर्यनमस्काराची संकल्पना देशभरात राबविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारेही या यज्ञात महत्वाचे योगदान देण्यात आले आहे. मनपाच्या शाळा, प्रभागातील विविध कार्यक्रम, मनपाचे शिक्षक या सर्वांनी ७५ कोटी सूर्यनमस्काराच्या यज्ञात आपले १६६७५ सूर्यनमस्कारांचे योगदान दिले आहे. शहरातील सूर्यनमस्काराच्या या यज्ञाचा बुधवारी (ता.९) अंबाझरी तलावानजीकच्या स्वामी विवेकानंद स्मारक येथे समारोप झाला. यावेळी मनपाच्या ७५ शिक्षक आणि शिक्षिकांनी सूर्यनमस्कार केले.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
योगाला जगात मान्यता मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला त्याचेच फलीत २१ जून रोजी विश्व योग दिन साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ७५ कोटी सूर्यनमस्काराचा उपक्रम घेण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेने सहभागी होत आपले योगदान दिले आहे. मात्र सूर्यनमस्काराचे हे व्रत केवळ या दिवसांपूरताच मर्यादित न ठेवता जीवनात दररोज नियमित सूर्यनमस्काराची सवय बानावणे आवश्यक आहे. सुदृढ आरोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार एक वरदान आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकात क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी या उपक्रमाची भूमिका विषद केली. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या यामध्ये सहभाग नोंदवून सूर्यनमस्कार केले. याशिवाय नगरसेवकांनीही आपल्या प्रभागस्तरावर सूर्यनमस्काराचे उपक्रम आयोजित केले आहे. मनपाच्या या उपक्रमात शिक्षकांनीही आपले योगदान देणे ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे म्हणाले, १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये देशभरात ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याची संकल्पना नागपूर शहरात राबविण्यात आल्याचा आनंद आहे. या उपक्रमाचा शहरातील समारोप मनपाच्या शिक्षकांमार्फत केला जात आहे. मनपातर्फे यापूर्वी स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी शहरातील पल्लवी खंडाळे या मुलीने ७५ मिनिटे सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केला. ही नागपूर शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. सूर्यनमस्काराच्या या महायज्ञात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महत्वाचे योगदान दिल्याचेही ते म्हणाले. मनपा शाळेचे शिक्षक सूर्यकांत मंगरूळकर आणि श्री अंभोरे यांनी यावेळी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाचे संचालन नियंत्रण अधिकारी नितीन भोळे यांनी केले. आभार सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी मानले.