लोहमार्ग पोलिसांनी केली अटक
संशयीत आरोपी फरार
नागपूर: एक आॅटोरिक्षा चालक अमरावतीला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आला. साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. संगणमताने त्याने मोबाईल चोरला. चोरीचा मोबाईल संशयीत आरोपी घेऊन गेला. मात्र, आॅटोरिक्षाचालक लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मोठा ताजबाग येथील रहिवासी शेख अनिस शेख युनूस (२३) हा आॅटोरीक्षा चालवितो. दोन वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले. त्याला एक मुलगी आहे. पत्नी आजारी असल्याने ती अमरावती येथे माहेरी गेली. त्यामुळे तोही अमरावतीला जाण्यासाठी रात्री रेल्वे स्थानकावर आला. दरम्यान येथे त्याची एका संशयीतासोबत मैत्री झाली. दोघांनी गप्पा मारल्या. दोघेही फलाट क्रमांक ८ वर गेले. यावेळी फिर्यादी कय्युम अनिला रेड्डी (१९, रा. करीमनगर, आध्रप्रदेश) हा गाडीच्या प्रतीक्षेत असताना त्याला झोप लागली. त्याचा मोबाईल ठळक दिसेल असा ठेवला होता. शेख युनूस आणि त्याच्या मित्राने कय्युमचा महागडा मोबाईल चोरला. चोरीचा मोबाईल शेख युनूसचा मित्र घेऊन फरार झाला. परंतु शेखला अमरावतीला जायचे असल्याने तो स्टेशनवरच थांबून होता. काही वेळातच कय्युमला जाग आली. त्याला मोबाईल दिसला नाही. लगेच त्याने आरपीएफ ठाणे गाठले. सारा प्रकार सांगितला. लगेच सीसीटिव्ही नियंत्रण कक्षात फूटेज तपासले असता शेख युनूस आणि त्याचा मित्र मोबाईल चोरताना दिसून आला. लोहमार्ग पोलिस (गुन्हे शाखा) पथकाने मोबाईल चोराचा शोध घेतला. काही वेळातच शेख युनूसला अटक केली. मात्र, त्याचा साथीदार मिळाला नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवून शेखला अटक केली. न्यायालयाने १६ मे पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास एएसआय विजय मरापे करीत आहेत.