नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर आज (४ डिसेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आता उद्या (५ डिसेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणत्या कामांना प्राधान्य देणार याबाबत भाष्य केले. अटल बिहारी वाजपेयी यांचे हे 100 जयंती वर्ष आहे. या महत्त्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे. इतका मोठा जनादेश आपल्याला जनतेने दिला आहे.
या जनादेशातून एवढंच म्हणेल आनंद आहे. पण जबाबदारी वाढली आहे. प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडक्या बहिणी, भाऊ असतील, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील या सर्वांनी दलित, वंचितांनी जो जनादेश दिला, त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल, असे फडणवीस म्हणाले. आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासनं पूर्ण करणं ही प्राथमिकता असेलच पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचे आहे.
2019 मध्ये जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात त्यांच्या सत्ता काळात आपल्याला त्रास दिला. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थितीत अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार, नेते संघर्ष करत होते, असे म्हणत फडणवीस यांनी सर्वांचे कौतुक केले.