नागपूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून त्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत निकालावर चर्चा, त्याशिवाय काही अपक्ष आणि बंडखोरांनाही संपर्क साधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
आज दुपारी ३ वाजता बैठक –
महाविकास आघाडीची आज दुपारी ३ वाजता बैठक आहे. निकालानंतर कुठलाही धोका होऊ नये यादृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. सर्व पर्यायांची चाचपणी करण्याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे. त्यात प्रामुख्याने इतर पक्ष, अपक्ष आणि बंडखोर यांच्याशी संपर्क साधण्याची चर्चा सुरू झाली आहे.
विजयाची शक्यता असणाऱ्या काही अपक्ष उमेदवारांना मविआ नेत्यांकडून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेसाठी काय गरज पडू शकते, काय काळजी घ्यावी लागेल याची चर्चा बैठकीत होणार आहे. जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल यावरही चर्चा करण्यात येणार आहे.