नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.त्यामुळे त्यांची लोकसभेची उमेदवारीही धोक्यात आली. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत जात पडताळणी समितीनं त्यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
त्यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळे आता त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
त्यामुळे नामांकन अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. यावेळी याचिकाकर्ते सुनील साळवे आणि रश्मी बर्वे दोन्ही गटांचं म्हणणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले.त्यानंतर रश्मी बर्वे यांचा नामांकन अर्ज रद्द ठरवण्यात आला, तर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे एबी फॉर्ममध्ये नाव असल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे.
या प्रकरणी रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. पण त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे. त्याच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.