नागपूर : राज्यात व देशाचा विकास महत्वाचा आहे. जनतेचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्राला क्रमांक १ वर आणण्यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे विकासासाठी राजकारणात बेरीज महत्वाची आहे, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
ते कोराडी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, राजकारणात जनतेच्या विकासासाठी कधी कधी तडजोड करावी लागते. कोणता मंत्री कोण होणार यापेक्षा जनतेचे हित महत्वाचे आहे. तिन्ही पक्षाच्या आमदारांचा त्यांच्या नेत्यावर विश्वास आहे. शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारांचा विश्वास अजित पवारांवर तर भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधींचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. नवे सरकार स्थापन झाले आहे व सर्वांना व जनतेला महाराष्ट्राचा विकास अपेक्षित आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात देशाची ६५ वर्षे वाया गेली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारत पूर्णत: आत्मनिर्भर व्हावा व जगातला सर्वोत्तम देश व्हावा यासाठी संकल्प केला आहे.
• सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यास उशीर होत आहे, म्हणून उद्धव ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पण विधानसभा अध्यक्ष स्वतः वकील आहेत. ते नियमानुसार निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंना केव्हाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. प्रफुल्ल पटेल यांनी जो खुलासा केला आहे, त्याचे उत्तर तेच देतील. तर राज ठाकरे यांना शरद पवारांविषयी माहिती असल्याने ते तसे बोलले असतील असेही ते म्हणाले.
• राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी पूर्ण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिराला भेट व परिसरात उभारलेल्या रामायणा कल्चरल सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, भारतीय विद्या भवन्सचे राजेंद्र पुरोहित यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.कोराडी येथे निर्माण करण्यात आलेले रामायणा सांस्कृतिक केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र आहे. असे केंद्र देशात कुठेही नाही. १८५७ पासून ज्या लढाया देशात झाल्या त्या आधारावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. देशातील मुख्य पर्यंटनस्थळ म्हणून या केंद्राची नोंद होईल, अशीही माहिती श्री बावनकुळे यांनी दिली.