नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. काल ठाकरेंनी नागपुरात शिवसैनिकांना मेळाव्याच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचा कलंक आहेत, अशी टीका केली. या टीकेच्या निषेधार्थ आज भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.
भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदविला.उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. राज्यासाठी ठाकरेच सध्या कलंक झाले आहेत. जाहीर सभेनंतर ते पळून गेले अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले नसते. यापुढे उद्धव ठाकरे यांना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा प्रवीण दटके यांनी ठाकरेंना दिला.
दरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी झाशीराणी चौकातून उद्धव ठाकरेंची निषेध यात्रा काढली. यात्रेत शहरातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.