बारामती :मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.समाजाच्या आक्रोशाचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करावा लागत आहे.
मराठा समाजातील काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो होता. या फोटोवर आपला संताप व्यक्त करत मराठा कार्यकर्त्यांनी त्यास काळे फासले. दरम्यान घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस दाखल झाले आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती तालुक्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.