नागपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सीताबर्डी मेन रोडवरील फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेच्या प्रवर्तन विभागाकडून सातत्याने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सीताबर्डीतील फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.आज मंगळवारी दुपारी पुन्हा अतिक्रमणचे पथक सीताबर्डीत धडकताच संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी कारवाईच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सीताबर्डी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलीसही घटनास्थळावर पोहचले. यावेळी नागपूर फेरीवाला व फुटपाथ दुकानदार संघटनेचे सरचिटणीस रज्जाक कुरेशी म्हणाले की आम्ही ३० वर्षापासून येथे व्यवसाय करतो. या रस्त्यावर ३४४ हॉकर्स आहेत.
यातील ८४ लोकांना लायसन्स दिले आहे. तर इतर हॉकर्सकडे महापालिकेचे कर्मचारी येऊन त्यांची नोंदणी करून गेले आहे. त्यांना परवान्यासाठी पावतीही दिली आहे. यासंदर्भात आम्ही मनपा आयुक्तांना भेटून परवाने लवकरात लवकर देण्याची मागणी केली होती. त्यांनी १५ दिवसांत देतो असे सांगितले होते. परंतु ३ महिने लोटूनही परवाने मिळालेले नाही. मग आम्ही उपाशी राहणार का ? असा सवाल कुरेशी यांनी उपस्थित केला. हे पाहता फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.