नागपूर : शहरात स्वतंत्र विदर्भ राज्यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपुरात आंदोलन केले आहे. क्रांतीदिनानिमित्त घोषीत आंदोलनानुसार आंदोलकांनी नागपुरातील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावण्यासह यशवंत स्टेडीयमवरून विधानभवनावर शनिवारी लाँग मार्चची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी यशवंत स्टेडियमवर शेकडो आंदोलक एकत्र आले.
आंदोलकांनी विधानभवनाच्या दिशेने लाँग मार्च काढला मात्र पोलिसांनी त्यांना विधानभवनात जाण्यापासून अडविले.
या आंदोलनादरम्यान दोन आंदोलक वेगळ्या मार्गाने थेट विधानभवन परिसरात पोहचले. त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न केला.अचानक या आंदोलकांनी विधानभवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी नंतर दोन्ही आंदोलकांसह शेकडो आदोलकांना ताब्यात घेतले. यादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समितीने स्वतंत्र विदर्भासह राज्यातील वाढते वीजदराला विरोध, विदर्भातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.