नागपूर : जेव्हापासून ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज झाला तेव्हापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याचा आरोप करीत थिएटरमधून हा चित्रपट काढा यासाठी पंचशील थिएटरपुढे भाजप उत्तर भारतीय मोर्चाने आंदोलन केले. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष सुरेंद्र पांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान आंदोलकांनी यावेळी थिएटरपुढे हनुमान चालिसाचे पठण केले.
या आंदोलनानंतरही हा चित्रपट बंद न झाल्यास चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा लेखक मनोज मुंतशीर, अभिनेता प्रभास यांच्या विरोधात पोलिसात एफआयआर करू असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनात सुधीर श्रीवास्तव, आशिष पांडे, संजय सिन्हा, छत्रृघ्न तिवारी, लालचंद मिश्र, वैभव शर्मा आदी सहभागी झाले होते.