नागपूर: मध्यभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘अॅग्रोव्हिजन – 2017: राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे’ उद्घाटन नागपूरमध्ये 10 नोव्हेंबर 2017 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वैंकेया नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. स्थानिक रेशीबाग मैदान येथे 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2017 दरम्यान अॅग्रोव्हिजन संस्थान, एम.एम.एक्टिव्ह , विदर्भ इॅकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउसींल (वेद) , पूर्ति उद्योग समूह व महाराष्ट्र उद्यमशिलता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सत्रामध्ये उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री व केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनर्रोत्थान मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , महाराष्ट्राचे कृषी मंत्री पाडुरंग फुंडकर , अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, नागपूरचे पालकमंत्री व राज्यांचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजनचे हे 9 वे वर्ष असून यासंदर्भात माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी अॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवि बोरकर , रमेश मानकर, संयोजक गिरीश गांधी, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी.मायी उपस्थित होते. यावर्षी अॅग्रोव्हिजनमध्ये 450 पेक्षा जास्त स्टॉल्सचा समावेश राहणार आहे.यामध्ये गाय, शेळया, मेंढया यांच्या विविध वाणाचे प्रदर्शन असणारे एक पशुधन दालन (लाईव्ह स्टॉक पॅव्हलियन) हे या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहे,असे प्रदर्शनाची माहिती देतांना रवि बोरकर यांनी सांगितले.
विविध कार्यशाळांचे आयोजन
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी कृषीविषयक कार्यशाळांचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री व केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनर्रोत्थान मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्य मंत्री गिरीराज सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. याप्रसंगी राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर व सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहतील.11 नोव्हेंबर 2017 रोजी ‘बांबू उत्पादन व संधी’ यावर तज्ज्ञांचे चर्चासत्र स्थानिक सुरेश भट सभागृहात होणार आहे. ‘विदर्भ दुग्ध विकास परिषद’ दिनांक 12 नोव्हेंबर 2017 रोजी होणार असून यामध्ये नॅशनल डेयरी डेवलपमेंट बोडचे अध्यक्ष डॉ. दिलीप रथ मार्गदर्शन करणार आहेत. 13 तारखेला दुपारी 2.00 वाजता सुरेश भट सभागृहात ‘गरजेहून जादा उत्पादनाचे व्यवस्थापन’ (सरप्लस मॅनेजमेंट) या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता होणा-या समारोपीय कार्यक्रमास केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ,केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद येसो नाईक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी छत्तीसगड , हरीयाणा व मध्यप्रदेशचे कृषी मंत्रीही उपस्थित राहतील.
या सर्व कार्यशाळा व परिषदेत भाग घेण्यासाठी ‘अॅग्रोव्हिजन मोबाईल अॅप’ वर सुविधा उपलब्ध आहे, या कृषी प्रदर्शनामध्ये भारतीय कृषी परिषद (आय.सी.ए.आर.), केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सी.एस.आय.आर.) , कृषी विज्ञान केंद्र, यांसारख्या संस्थाचे तसेच कृषीयंत्र, पाणी-व्यवस्थापन, बँका, विमा कंपन्या, बीयाणे, खते यांचे स्टॉल्स असणार आहेत. बचतगटातर्फे ‘फूड कोर्टही’ या प्रदर्शनात असेल.या कृषी प्रदर्शनास 4 ते 5 लक्ष शेतकरी भेट देतील. कृषी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळेच्या माध्यमातून यशस्वी कास्तकार व शेतक-यांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सर्व राज्यातील शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन अॅग्राव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी पत्रकार परिषदेत केले.