राखेच्या बांधऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा
नागपूर : कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने पाच गावातील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. महाजनकोने आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले. या नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले.
अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत राखयुक्त पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी घरांचे तसेच शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली होती.
त्यांनतर कोराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याची सूचना केली होती. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे आज १३ गरीब नागरिकांना ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत घराच्या नुकसान भरपाईचा धनादेश महाजनकोकडून मिळाला. या नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले.
शेतकऱ्यांना लवकरच मदत : आमदार बावनकुळे
माजीमंत्री आमदार बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून त्यांनाही लवकरच मदत मिळणार असल्याचे सांगितले. आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळाली. पुढील तीन वर्षे येथील शेतीत पिकं होणार नाही, ही बाब लक्षात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यांनी घरांचे नुकसान झालेल्यांना मदत दिल्याने त्यांचे आभार मानतो. याशिवाय हा बंधारा फुटलाच कसा याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही केली असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.