मनपा व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळा
नागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे (कर्करोगाचे) प्रमाण ही गांभीर्याची बाब आहे. वैद्यकीय अधिका-यांकडून समाजामधील रुग्णांच्या उपचारासह या धोकादायक आजारापासून बचावाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स)ने पुढाकार घेतला आहे.
नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व टाटा ट्रस्टच्या वतीने शनिवारी (ता.१५) मनपातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखू नियंत्रणाबाबत क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन सिव्हील लाईनमधील हॉटेल हेरिटेज येथे करण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स)च्या मेजर जनरल डॉ. विभा दत्त यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. के.बी.तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिका-यांना यावेळी एम्सच्या सामुदायिक आरोग्य विभागाच्या (community medicine) अधिका-यांमार्फत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
संपूर्ण देशासह नागपूर शहरातही तंबाखूजन्य पदार्थांचा प्रभाव वाढत आहे. त्याचा परिणाम विविध स्वरूपाच्या कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिका-यांनी जागरुक असणे आवश्यक आहे. रुग्णांच्या उपचारासह त्यांचे समुपदेशनही होणे महत्वाचे आहे. रुग्णांचा उपचार करून त्यांना धोकादायक आजारापासून बरे करण्यामध्ये एम्स नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र केवळ रुग्ण बरे करणे हाच उद्देश न ठेवता तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. ही जागृती निर्माण करण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणा-या आजारावरील उपचारांसह त्याबाबत समाजात जागृती व्हावी हा उद्देश पुढे ठेवून वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
मोठमोठ्या आजारांसाठी रुग्णांच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरत असतात. त्याकरीता उपचारासाठी रुग्णालयात येणा-या रुग्णांच्या सवयी विचारणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र अवघे ५०टक्के डॉक्टरच रुग्णांच्या सवयी विचारून त्याची नोंद घेतात. ही गरज लक्षात घेउन डॉक्टरांनी रुग्णांच्या सवयी विचारून त्या कशा धोकादायक आहेत व सोडविण्यात याव्यात यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. केवळ उपचारच न करता जनजागृती करूनही व्यसनावर आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मनपा आरोग्य विभाग, टाटा ट्रस्ट व एम्सच्या सामुदायिक आरोग्य विभागाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व पदाधिका-यांनी सहकार्य केले.