नागपूर : एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना करण्यात आले.
समारंभात मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, सुरक्षा प्रमुख यशवंत सराटकर, एमआरओच्या इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख एस.एस. काजी, एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे आणि एमआरअोचे अधिकारी उपस्थित होते.
जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा
नागपूर मिहान प्रकल्पातील एमआरओ सुविधा ५० एकरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेला हा प्रकल्प ६०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला असून ३.५ कि.मी. टॅक्सी-वेला जोडला गेला आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि १०० मीटर बाय १०० मीटरचे दोन हँगर आहेत. मोठ्या विमानांसह सर्व प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सोय आहे. बोर्इंग विमानांसाठी विशेष व्यवस्था आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी अभियंते आहेत. बोर्इंगने प्रकल्पाचे काम मार्च २०११ मध्ये सुरू केले आणि प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण केला.
२९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकल्प एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि २७ आॅगस्ट २०१५ रोजी कार्यान्वित झाला. एअर इंडियाने स्पाईसजेट विमानांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६ मध्ये करार केला. स्पाईसजेटची दोन विमाने आतापर्यंत एमआरओमध्ये तपासणी आणि दुरुस्तीसाठी आली आहेत. स्पाईसजेटच्या ताफ्यात ४२ विमाने आहेत.