नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विरोधकांनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध केला. हे पाहता आज, गुरुवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.
जुन्या पेन्शनसंदर्भात बैठक-
जुन्या पेन्शनसंदर्भात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव होते. मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही पवार म्हणाले.