नागपूर : राज्याच्या राजकरणात सध्या मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा सुरु झाल्या आहे. कालच नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लागले होते. तर आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्याकडून ‘मुख्यमंत्री पदासाठी अजितदादाच पक्का’ अशा आशयाचे बॅनर धरमपेठ येथील लक्ष्मीभवन चौकात लावण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात सुरु असलेल्या बॅनरबाजीवरून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकानंतर मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसत आहे. नागपुरातील राष्ट्रवादीचे नेते आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. यावर ‘वाचनाचा पक्का,हुकुमाचा एक्का मुख्यमंत्री पदासाठी अजितदादाच पक्का, असे कॅप्शन त्यांनी बॅनरवर लिहिले. इतकेच नाही तर या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्रशांत पवार यांचा फोटो दिसत आहे. मात्र ज्याच्यासंदर्भात हा बॅनर लावण्यात आला त्या अजित पवार यांचाच फोटो नसल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.
दरम्यान अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती. होय 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तसे च 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का या प्रश्नावरही 2024ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार असल्याचे ते म्हणाले होते.