गोंदिया/भंडारा:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पक्षाच्या वतीने जागेची चाचपणी सुरु केली.
जागा वाटपाबाबत उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे. यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आमच्या हक्काच्या तीन जागा घेणार आहोत, यासाठी वाद झाला तरी चालेल. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.
यासोबतच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगीही आपल्या संपर्कात असल्याचा दावा, देशमुख यांनी केला.
मी माझ्या वडिलांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे त्यांची मुलगी म्हणते. त्यांच्या मुलीने तीनदा शरद पवार यांची भेट घेतली.माझ्या वडिलांनी तुमच्याशी जे केले ते मला आवडले नाही. तुम्ही मला तिकीट द्या, मी माझ्या वडिलांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे आत्राम यांची मुलगी म्हणत असल्याचे देशमुख म्हणाले.