नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच नागपुरात पार पडला. शपथविधी सोहळ्यात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारामध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यावरून छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे अजित पवार देखील मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.
हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोमवारपासून सुरु झालं आहे. पहिल्या दिवशी अजित पवार गैरहजर राहिले होते. आजही अजित पवार विधानभवनात अद्याप उपस्थित नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विरोधकांकडून याच मुद्द्यावरून सरकारला घेरले जात आहे. छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असतानाच अजित पवार अचानक गायब झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
“जहा नही चैना वहा नही रहेना” -छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून “जहा नही चैना वहा नही रहेना” असे सूचक वक्तव्य करत थेट येवला मतदारसंघात पोहोचले आहेत. छगन भुजबळ आज नाशिकच्या भुजबळ फार्मवर आपल्या समर्थकांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यभरातूनच भुजबळ समर्थक तसेच ओबीसी समाजाचे पदाधिकारी भुजबळ फार्मवर येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळ साहेबांवर अन्याय झाला असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.