नागपूर : राष्ट्र्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. सर्व घडामोडी अचानक घडल्यामुळे शिवसेना आणि भाजपचे आमदार संभ्रमात आहेत. यातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपले मत मांडले.
राज्य सरकारमधील खातेवाटपामध्ये प्रत्येकाला वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी निधी दिला होता. तसे आता होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेले, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटते की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये, अशी मागणी कडू यांनी केली.
राज्यात शिंदे – भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. हे पाहता आपल्या नेत्याची नाराजी दूर करणं हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशा नाराजीची भावना प्रत्येकामध्ये आहे.