मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही. त्यामुळे आपला राजीमाना मागे घेत असल्याचे पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मात्र यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. याबाबत अजितदादांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यातील, देशातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचा आग्रह मान्य करून आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावं, साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजूबत करावा असे अवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.