नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा देणारे आणि अजित पवारांची बाजू न घेणारे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या भाजपसोबत अजित पवारांच्याही हिटलिस्टमध्ये आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फौऱ्या सुरू झाल्या आहे.
नागपुरात 3 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या महिलांची बैठक आयोजित करण्यात आली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी ते अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघ काटोलमध्ये सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे .
काटोल हा अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथून ते पाच वेळा निवडून आले. २०२४ ची निवडणूक ते या जागेवरून लढवणार असल्याची चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. जर असे झाल्यास काटोलमध्ये कोण लढणार याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीची जागा असल्याने अजित पवार गट या जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा काटोल दौरा महत्त्वाचा आहे. पक्ष फुटल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच काटोलमध्ये येत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.