Published On : Fri, Oct 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अजितदादांचा दाखवण्यापेक्षा अॅक्शनवर विश्वास, म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं – सयाजी शिंदे

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांचे पक्षात स्वागत केले.

सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत समाजातील उपेक्षित घटकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या प्रबळ मराठा समाजातील शिंदे यांच्याकडे स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आधार असून त्यांच्या ‘सह्याद्री देवराई’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते राज्याच्या ग्रामीण भागात सक्रीय पणे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या प्रवेशाचा उद्देश ग्रामीण मतदार तसेच विचारवंत वर्गात पक्षाचा पाया मजबूत करणे हा आहे, कारण ते विचारवंत वर्तुळात चांगलेच लोकप्रिय आहेत. अजित पवार यांनी सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक बनून राज्यभर प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे पक्षात स्वागत करताना सयाजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिंदे यांनी विशेषत: वृक्षलागवड, पाणी व मृदसंधारण क्षेत्रात घेतलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. ते केवळ अभिनेते नाहीत, तर सच्चे समाजसेवक आहेत, याची साक्ष त्यांचे सामाजिक कार्य आहे. सयाजींची विचारधारा आणि त्यांचे प्रयत्न आमच्या पक्षाच्या मूळ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत, जे समाजाच्या प्रत्येक स्तराच्या उन्नतीसाठी समर्पित आहे, असे अजित पवार म्हणाले. सयाजी शिंदे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची धोरणे व कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे राष्ट्रवादी चे अध्यक्ष म्हणाले.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी अजितदादांशी असलेल्या आपल्या जुन्या नात्यावर भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते आपल्या शब्दावर ठाम आहेत.ते आतून जसे आहे, तसेच बाहेरही आहे. आणि स्वभावाने मीही तसाच आहे. माझ्या मनात जे काही आहे, ते मी स्पष्टपणे बोलतो, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. अजितदादा आणि माझ्यात हे काहीतरी साम्य आहे. सयाजी शिंदे आपल्या ‘सह्याद्री देवराई’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. राजकारणात येऊन आपण समाजसेवा पुढे नेऊ शकतो आणि समाजासाठी अधिक योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले. त्यांच्यासाठी अजित पवारांपेक्षा चांगला पर्याय नाही, कारण त्यांचा पक्ष उपेक्षितांसाठी काम करतो – शेतकरी, महिला, मजूर. राष्ट्रवादीची विचारधारा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे, जी मला मनापासून भावते, असे शिंदे म्हणाले. सर्व पक्षांपैकी आपण राष्ट्रवादीची निवड का केली, या प्रश्नावर अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, “इतर पक्षात जाण्यासाठी बरेच पर्याय होते, परंतु मी केवळ अशा पक्षात जाण्याचा विचार केला जिथे नेतृत्व पारदर्शक असेल आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या कल्याणासाठी काम करेल”. अजित पवार यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व वेगळे असून माझ्याप्रमाणेच त्यांचाही दाखवण्यापेक्षा कृतीवर विश्वास आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement