नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात ६ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी थेट निवडणूक होईल. यात एकूण २९४० जागांसाठी मतदान होईल. जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच ३७४ ग्रा.पं.च्या विविध संवर्गातील सदस्य पदासाठी ५९९४ उमेदवार रिंगणात आहेत.
१५ सप्टेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकींचा गागोगावी फड रगंला होता. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.मध्ये सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यात ग्रा.पं.च्या प्रचारात उडी घेतल्याचे दिसून आहे.
राजकीयदृष्ट्या विचार केल्यास नागपूर जिल्ह्यावर भाजपचे प्रभृत्त्व आहे. मात्र अजूनही ग्रा.पं.पातळीवर काँग्रेसची पांरपरिक पकड आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजप आणि काँग्रेसप्रणीत पॅनेलमध्ये काट्याची टक्कर असल्याचे चित्र आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बसपाने आपले पॅनेल या निवडणुकीत लढविले आहे. काही तालुक्यात या पक्षांचे उमेदवार काँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनेलच्या उमेदवारांना घाम फोडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ग्रा.पं.मध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
ग्रा.पं.निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कुठेही गोंधळ होणार नाही. त्यादृष्टीने अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी ग्रा.पं. निवडणुकीत मोठ्या संख्येने भाग घेत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.