स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तरुणींनाभुरळ घालणाऱ्या सुयोग गोऱ्हेची झलक यात आपल्याला पाहायला मिळाली. या टिझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच उत्सुकता होती, ती ‘सातारचा सलमान’ची हिरोईन कोण? याची. मात्र हे गुपित अखेर उलगडले असून यात सायली संजीव आणि शिवानी सुर्वे आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
नुकतेच या दोघींचे कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पोस्टरवरील सायलीचा लूक पाहता ती ‘माधुरी माने’ या निरागस, सोज्वळ मुलीची भूमिका साकारत असून शिवानी ‘दिपिका भोसले’ या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारत आहे.
यात सुयोगची नायिका नेमकी कोण आहे? म्हणजे दोघीही का कोणीतरी एक? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले आहे.
हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार, भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.