वेगवेगळे आमिष दाखवून पीडितेला दिला त्रास
नागपूर: ऑफिसच्या कामानिमित्ताने विदेशी यात्रा आणि महागडे गिफ्ट देण्याच्या नावाआड रुग्णालयाच्या महिला व्यवस्थापकाची छेडखानी करण्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील अलेक्सिस रुग्णालयात घडला आहे. याप्रकरणी पीडित महिला मॅनेजरने आज सोमवारी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अॅलेक्सिस रुग्णालयाचे आरोपी संचालक सूरज प्रकाश त्रिपाठी याच्या विरुद्ध छेडखानीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीत नमूद माहितीप्रमाणे, पीडिता २०१६ साली अॅलेक्सिस रुग्णालयात मॅनेजर पदावर रुजू झाली होती. तेव्हापासून सूरज हा वेगवेगळ्या कारणांवरून पीडितेशी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असा व्यवहार करायचा. सुरजच्या अश्लील बोलण्यामुळे पीडिता चांगलीच धास्तावली होती. याविषयी तिने त्याला समज दिली आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीकडे तक्रारही केली. तेव्हा सुरजने पीडितेची माफी मागितली होती. काही दिवस चांगले वागल्यानंतर तो पूर्वीप्रमाणेच पीडितेची छेड काढू लागला. १४ जानेवारी, २०१९ रोजी आरोपीने कामानिमित्ताने तिला स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलावून तिची छेड काढली.
पीडितेने सूरजवर लावलेल्या इतर आरोपानुसार तो रुग्णालयाच्या कामानिमित्ताने पीडितेला विदेशात घेऊन जायचा. या दरम्यान तिला अनावश्यक स्पर्श करणे, तिच्या मर्जीविरुद्ध अश्लील गोष्टी करणे आणि तिच्या रुममध्ये मद्यपान करणे हे प्रकार तो सर्रास करायचा. पीडितेने त्याला असे न करण्यास सांगितले असता त्याने तिला नोकरीवरून काढण्याची धमकीही दिली. आरोपीचे पीडितेला दिवसातून २०-२५ वेळा तिला फोन करणे, महागडे गिफ्ट देऊन तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे यामुळे ती चांगलीच धास्तावली होती. या मानसिक त्रासापाई तिने घडत असलेल्या प्रकाराची कल्पना तिच्या दोन मानलेल्या भावांनाही दिली होती. त्यांनीही सुरजला समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकायला तयार नव्हता.
पीडितेने सुरजविरुद्ध मॅनेजमेंटकडे वारंवार तक्रार करूनही त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे त्याची हिम्मत आणखीच वाढली. पुढे पीडितेचा पाठलाग करण्यापर्यंत आणि तिचा हात पकडण्यापर्यंत त्याची मजल गेली. रोजच्या या प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने अॅलेक्सिस हॉस्पिटलचे संचालक सूरज त्रिपाठी याच्याविरुद्ध १९ जानेवारी, २०२० रोजी मानकापूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी अद्यापतरी त्याला अटक झालेली नाही.
अॅलेक्सिस मॅनेजमेंट आणि पोलिस संशयाच्या भोवऱ्यात!
आरोपी सूरजकडून पीडितेची छेडखानी काढण्याचा प्रकार मागील ३ वर्षांपासून चालत होता. याविरुद्ध तिने रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रारही केली होती; परंतु सूरज हा संचालक असल्याने त्याच्या कृत्यांना मॅनेजमेंटने दुर्लक्षित केले. यामुळे त्याची हिम्मत आणखी वाढत गेली. आरोपीचे पद आणि त्याच्या पावरपुढे रुग्णालय मॅनेजमेंट दुबळे पडले का? असा प्रश्न या प्रकरणातून निर्माण होतोय. दुसरे म्हणजे, माणकापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध छेडखानी आणि धमकाविण्याचा गुन्हा नोंदविला असला तरी त्याला तातडीने अटक करणे अपेक्षित होते; मात्र तसेही काही घडले नाही. आरोपीचे पद, पैसा, पावर आणि बड्या लोकांशी असलेली ओळखी यापुढे अॅलेक्सिस रुग्णालयाचे मॅनेजमेंट आणि मानकापूर पोलिस प्रशासन दोघेही हतबल आहेत का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.