ट्रिपल ड्रग” उपचार पद्धतीचा उद्यापासून शुभारंभ
नागपूर: महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यात लिफँटिक फिलरियासिस किंवा ‘हत्तीरोग’ ही एक चिंताजनक आरोग्य समस्या आहे. डासांमुळे पसरणारा हा रोग वेदनादायी आणि विद्रुपीकरण करणारा असला तरी रोखण्यासारखा आहे. म्हणून हत्तीरोगाच्या निवारणासाठी सर्वानी एकत्रित लढू या असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल तुली येथे आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, सहायक संचालक हिवताप डॉ. मिंलीद गणवीर,जागतिक आरोग्य संघटनेच्या रश्मी शुक्ला, सह संचालक हत्तीरोग डॉ. जितेद्र डोलारे उपस्थित होते.
लिफँटिक फिलरियासिस (हत्तीरोग)हा आजार हद्दपार करण्यासाठी आखलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेची सुरुवात उद्यापासून (20 जानेवारी) या दिवशी करणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांना ही औषधे दिली जावी यासाठी पंधरा दिवस आरोग्य विभागाच्या वतीने सतत प्रयत्न केले जातील.
सरकारचे आरोग्य सेवक या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊन विनामूल्य औषध वाटप करतील. फिलरियासिस चा संसर्ग रोखणारी ही औषधे-डायथिल कार्बामेझिन सायट्रेट (DEC) आणि अलबेंडाझॉल- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरलेल्या प्रमाणात दिली जातात. नागपूर मधील उपक्रमात मात्र आजाराचे उच्चाटन करण्याच्या या प्रयत्नांना गती मिळावी यासाठी तीन औषधांचा एकत्रित वापर (ट्रिपल ड्रग थेरपी) केला जाणार आहे. यात आयवरमेक्टिन या तिसऱ्या औषधाचा समावेश आहे.
2017 या वर्षाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात या आजाराचे 65,000 रोगी आढळून आले आहे. नागपूर परिसरात 4758 व्यक्तींना अवयव सुजण्याचा त्रास झाला तर 2877 व्यक्तींना गुप्तांगांना सूज येण्याचा त्रास झाला.
लिफँटिक फिलरियासिस साठीच्या राष्ट्रीय मोहिमेत भारत सरकार 2004 पासून सामाजिक पातळीवर अशी औषधे देण्याचे प्रयत्न करीत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातील 256 जिल्ह्यापैकी 100 जिल्ह्यांमध्ये या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही अशा बहुतांश जिल्ह्यांत औषध वाटपाच्या दहा मोहिमेनंतरही या रोगाचा संसर्ग सुरक्षित पातळीपेक्षा जास्त आहे. यासाठीच तिहेरी औषध (ट्रीपल डोस )उपचार करण्यात येणार आहे.
यावेळी हत्तीरोगासंदर्भातील अडचणीवर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिस अमनदीप सिंग, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल उपस्थित होते .