नागपूर : राज्याच्या सिंचन विकासाचे नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या जलसंपदा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. राज्यातील पाचही पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी संचालकांच्या खुर्च्या रिकाम्या असून प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यभार सोपवून वेळ काढणे सुरू आहे. विशेष म्हणजे काही प्रभारी अधिकाऱ्यांची निवृत्ती जवळ आली आहे. अशात राज्य सरकारने वेळीच याची दखल घेत सिंचनाचा डोलारा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.
विदर्भ सिंचन विकास महामंडळातील कार्यकारी संचालकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून पद रिक्त आहे. मुख्य अभियंता शेख यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. मात्र, शेख हे देखील पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. याशिवाय नागपुरातील मुख्य अभियंताचे एक व अमरावती येथील दोन पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे सिंचन विकास महामंडळातही चित्र तसेच आहे. जळगाव येथील कार्यकारी संचालकासह मुख्य अभियंत्याचेही पद रिक्त आहे.
कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळ, पुणे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळातही पूर्णवेळ कार्यकारी संचालक नाही. पुणे येथील मुख्य अभियंत्याचे पद रिक्त असून प्रभारीवर काम सुरू आहे तर दुसऱ्या मुख्य अभियंत्याची बदली झाली असून त्यांनी पदभार सोडल्यावर ती खुर्चीही रिकामीच राहणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादलाही पूर्णवेळ कार्यकारी संचालकाची प्रतीक्षा आहे.