नागपूर : मुंबईतील घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला.घाटकोपर सारखी घटना नागपुरात घडू नये म्हणून शहरातील होर्डिंगचे नव्याने सर्वेक्षण होणार आहे. शहरात ठिकठिकाणी रेल्वेच्या जागेवरील सर्वच होर्डिंग अवैध आहेत. याबाबत महापालिकेने रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला. मात्र,त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मुंबईच्या घटनेची नागपुरात अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंजचे सर्व्हे व्हावे, असे माजी नगरसेवक विजय झलके म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून अवैध होर्डिंग तत्काळ काढण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले. नागपुरात महापालिकेच्या नोंदीला १ हजार ७१ होर्डिंग्स आहेत.तर ठिकठिकाणी अवैध होर्डिंग लावल्या गेले आहेत.
नागपूर महानगरपालिकेने घाटकोपर येथील घटनेची गंभीर दखल घेत शहरातील धोकादायक असे सर्वच होर्डिंगची तपासणी होणार आहे.
शहरात तीन ते दहा वर्षापर्यंतचा कालावधी बहुतांश होर्डिंगला झाला आहे. त्यावेळी एजन्सींनी परवानगी घेताना स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिले होते. आता पुन्हा २०२४-२५ करिता होर्डिंगचा नव्याने सर्व्हे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.